''Injections न घेता तशीच नाही का होणार प्रेग्नन्सी?आमचे नातेवाईक म्हणाले की ही अशी औषधे आणि इंजेक्शन घेणं वाईट असतं आणि बाळामध्ये व्यंग येऊ शकतात त्यामुळे..
वंध्यत्वावर उपचार घेऊन झालेल्या बाळामध्ये व्यंग असण्याची शक्यता ही कोणत्याही सर्वसाधारण बाळा इतकीच असते हे अगदी स्वच्छ आणि स्पष्ट वैद्यकीय सत्य आहे .किंबहुना क्वचित काही स्त्रियांमध्ये गर्भामध्ये जनुकीय आजार वारंवार दिसून आल्यास अशा स्त्रियांना IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी चे उपचार सुचवले जातात .यात गर्भ तयार झाल्यावर त्याची जनुकीय तपासणी केली जाते आणि मगच गर्भ गर्भाशयात सोडला जातो.या पध्दतीमुळे जनुकिय आजार असलेल्या जोडप्यांना सुद्धा निरोगी बाळ होऊ शकते.
विज्ञानाने इतकी आश्चर्यकारक प्रगती केलेली असताना त्याचे फायदे घ्यायचे सोडून आपण विनाकारण अशास्त्रीय ,अतार्किक गोष्टींवर का विश्वास ठेवतोय हा विचार प्रत्येकाने करायला हवा.
दिवस न राहण्यामागे अनेक कारणे असतात.स्त्रीबीज तयार न होणे हे सर्वात कॉमन कारण आहे.मग गोळ्या देऊन स्त्रीबीज तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात .कोणत्या असतात या गोळ्या?तर स्त्रीच्या शरीरात एरवी जे हॉर्मोन्स असायला हवेत त्याचे प्रमाण योग्य नसल्यामुळे या समस्या उद्भवतात.मग या गोळ्या हे हॉर्मोन्स योग्य प्रमाणात निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करतात .काही वेळा नुसत्या गोळ्यांनी योग्य तो परिणाम साधला जात नाही मग अशावेळी थेट हॉर्मोन्स ची इंजेक्शन्स दिली जातात .हे सगळे हॉर्मोन्स स्त्रीच्या शरीरात एरवीही असतातच फक्त त्याचे प्रमाण योग्य नसते.मग मला सांगा की यामुळे व्यंग कसे येईल बाळामध्ये??आणि वंध्यत्वावर उपचार देताना बाळात व्यंग येईल अशी औषधे कशी वापरतील डॉक्टर्स?अशा औषधांवर बंदी नसेल का?
गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल सुद्धा असे विचित्र गैरसमज लोकांमध्ये दिसतात.या गोळ्या घेतल्या तर नंतर दिवस राहात नाहीत,राहिले तर बाळात व्यंग येते वगैरे ,हे गैरसमज कधी कधीकधी मुद्दाम पसरवले जातात.नव्या पिढीला गर्भनिरोधक गोळ्यांची भीती घालायची म्हणजे दुसरी साधने जास्त परिणामकारक नसल्याने आपोआपच प्रेग्नन्सी राहते आणि नातवंडे बघायची आस पूर्ण होते .अर्थात हा विचार ज्येष्ठ पिढीकडून नकळत केला जातो.
वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्या जोडप्यांना अजून एक चिंता सतावत असते ती म्हणजे आपण कृत्रिमरीत्या दिवस राहण्यासाठी प्रयत्न करतोय.याचे वाईट परिणाम होऊ शकतात .ही खरंतर अंधश्रद्धा च आहे.आपण सध्याच्या आयुष्यात किती गोष्टी निसर्गात जश्या होतात तश्या करतो?मानवाने प्रत्येक गोष्ट आपल्या सोयीनुसार बदलूनच घेतली आहे ना?निसर्गानियमानुसार वागायचे ठरवले तर बहुसंख्य समस्या असलेल्या जोडप्यांना कधीच मूल होऊ शकणार नाही .म्हणजे खरंतर मनुष्यप्राणी साध्या साध्या आजारातून बरा देखील होणार नाही .वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाने क्रांती होण्याआधी हेच होत होतं .
वंध्यत्वावर उपचार करताना प्रत्येक वेळी नैसर्गिक गोष्टींचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो .फक्त त्यासाठी औषधे आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते.त्यामुळे नको त्या शंकांना मनात थारा न दिलेलाच बरा.
सध्याच्या काळात वंध्यत्वाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.बरीच जोडपी अजून थोड्या वर्षांनी बघू,पैसे जमल्यावर बघू असा विचार करून वंध्यत्वाचे उपचार लांबणीवर टाकतात .पण भारतीय स्त्रियांची प्रजोत्पादन क्षमता वयाच्या तिशीनंतर कमी होऊ लागते आणि पस्तिशीनंतर झपाट्याने कमी होते .त्यामुळे जोडप्यांनी त्यांच्याकडे पैसा आणि उपलब्ध वेळ येईपर्यंत फार वाट पाहिली तर वय मात्र निघून गेलेलं असू शकतं आणि मग IVF सारखे उपचारही प्रभावी ठरत नाहीत.
त्यामुळे मनातल्या शंकाकुशंका दूर करून वेळीच उपचार घेणं हेच या जोडप्यांच्या हिताचं आहे आणि त्यांना वेडेवाकडे आणि अशास्त्रीय सल्ले न देणं हे त्यांच्या नातेवाईकांचं कर्तव्य आहे..हो ना?
@crazycervix
No comments:
Post a Comment