All Information Related to Women Health And Their Issues like Obstetrics,Pregnancy,Superstitions Mahila Arogya

Saturday, September 26, 2020

मासिक पाळी आणि रूढी अंधश्रद्धा

श्रावण महिना सुरु झाला की सगळ्या स्त्रीरोगतज्ञांच्या क्लिनिकमध्ये ऐकू येणारा हमखास संवाद! 
“डॉक्टर, घरी पूजा आहे... पाळी लांबवण्याच्या गोळ्या हव्या होत्या...”

या बाबतीत पेशंट स्त्रियांची समजूत घालण्याचा आम्ही स्त्रीरोगतज्ञ खूप वेळा  प्रयत्न करतो.
मासिक पाळी येणे हे जननक्षमतेचे लक्षण आहे. देवीचे दर्शन घेताना पाळी चालू असेल तर काय बिघडले? घरी पूजा करताना पाळी चालू असेल तर काय घडते??
देवाला जायच्या आधी इतर शारीरिक धर्म आपण आंघोळ करून जात असू तर पाळी चालू असताना आंघोळ करून दर्शनाला गेले तर काय फरक पडतो?
२८ मे जागतिक मासिक पाळी दिन म्हणुन पाळला जातो हेही कोणालाही माहीत नसणारच. भारतात अजूनही मासिक पाळीच्या संदर्भात अंधश्रद्धा अजूनही टिकून आहेत. काळजी करू नका. यातल्या बऱ्याच अंधश्रद्धा व चांगल्या प्रथाही भारतातच नाही, तर सगळ्या जगभर पसरल्या आहेत. मासिक पाळी या गोष्टीकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. भारतातच नव्हे तर जगातील अशा बऱ्याच देशांमध्ये मासिक पाळीबद्दल आजही निष्ठुर, निर्दयी अंधश्रद्धा पाळल्या जातात.


जेव्हा स्त्रियांच्या देवळातल्या प्रवेशाबद्दल चर्चा सुरु असते तेव्हा ह्या सर्वात महत्वाच्या मुद्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसतेच. मासिक पाळी चालू असताना स्त्रीला दिली जाणारी संतापजनक वागणूक.

पण दुर्दैवाने आपल्या समाजातल्या सर्व स्त्रियांच्या मनावर मासिक पाळी म्हणजे अशुध्द, अस्वच्छ अशा अत्यंत चुकीच्या समजुतींचा पगडा इतका पक्का आहे की समजावून सांगूनही स्त्रिया ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. 
सर्वात चिंताजनक परिस्थिती ही सुध्दा आहे की, करीअर करणाऱ्या, इंजिनीयर किंवा कधीकधी डॉक्टर असलेल्या महिला सुध्दा ह्या गैरसमजुतीतून बाहेर पडू शकत नाहीयेत. बऱ्याच जणींना हे चुकीचे आहे हे पटते पण घरचे व बाहेरचे काही कर्मठ लोक ‘तू असं केलंस तर देवाचा कोप होईल’ वगैरे तथ्यहीन विचार ह्या महिलांना भरकटत लावतात.
मुळातच मासिक पाळी का येते हे समजून घेणे महत्वाचे आहे.
अजूनही कित्येक स्त्री -पुरुषांना याचं कारणच ठाऊक नसतं. ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे.
गर्भाशयाच्या आतील आवरण दर महिन्याला तयार होत असते.स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला स्त्रीबीज ही तयार होतं. जर त्याचा पुरुष शुक्राणूशी संपर्क आला तर तिला गर्भ राहातो.  गर्भधारणा झाली तर तयार होणाऱ्या गर्भासाठी पोषक द्रव्ये मिळवीत म्हणून ही तयारी असते. गर्भधारणा झाली नाही तर हे आवरण पाळीच्या रूपाने निघून जाते. आणि ते रक्त योनीवाटे बाहेर पडते.हे आहे  मासिक पाळी येण्याचे साधे सोप्पे कारण. 
मग हेच रक्त अपवित्र,  मग ते रक्त जिच्या शरीरातून वाहून जाते ती बाई अपवित्र असं म्हणत म्हणत तिला विटाळशी करतो आणि तिच्यावर नसत्या नियमांचं ओझं लादतो. एकाबाजूला लग्न झालेल्या बाईला मूल व्हायलाच पाहिजे हा धोशा आणि ते होण्यासाठी जी रक्ताची गादी लागते ती तुटली की बाई अपवित्र असा विरोधाभास आहे .

मग हे रक्त अशुध्द कसे असेल? आता तर संशोधनाअंती असा सिध्द झालाय की, या रक्तात stem cells असतात जे विविध पेशींमध्ये रुपांतरीत होऊ शकतात. म्हणजे नवनिर्माण करण्याची सृजनशक्ती असलेल्या पेशी या पाळीच्या रक्तात असतात. काही आन्तरराष्ट्रीय कंपन्या हे रक्त जमा करून त्यातून stem cells काढून घेण्यासाठी महिलांना आर्थिक मोबदला पण देण्यास तयार आहेत. आणि आपण मात्र जुन्या पुराण्या बुरसटलेल्या समजुती कवटाळून बसलो आहोत.
मुळात ह्या समजुती पसरवणाऱ्या मागे पुरुषप्रधान संस्कृतीचाच हात आहे. स्त्रीच्या शरीराला अपवित्र मानले, तिला त्या चार दिवसात अस्पृश्य मानले की तिचा आपोआप तेजोभंग होतो. तिला मानसिक आणि शारीरिक खचवण्याचा हा उत्तम उपाय त्यावेळच्या कर्मठ लोकांना सापडला असावा.
पाळीच्या वेळी विश्रांतीची गरज असते वगैरे हे युक्तीवाद धादांत ढोंगीपणाचे आहेत. आपल्या समाजात एरवी खरोखर आजारी असलेल्या स्त्रीलाही विश्रांती मिळत नाही मग पाळीच्या वेळी गरज नसताना सक्तीची विश्रांती कशासाठी? 
या जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांच्या पगड्यांमुळे कित्येक स्त्रियांचे आयुष्य दुर्धर होऊन बसताना आम्ही बघतो. कोणताही सण समारंभ अथवा यात्रा असेल तर त्यातील आनंद अनुभवायचा सोडून ‘तेव्हा माझी पाळी तर येणार नाही ना’ याच विचारात ह्या स्त्रिया चिंतातूर होतात. मग पाळी लांबवण्याच्या गोळ्या सतत घेणे सुरु होते. स्त्रियांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने या गोळ्या सारख्या घेणे हानिकारक असते.कधी कधी तर ह्या सगळ्याला कंटाळून ‘गर्भपिशवी काढून टाका’ अशीही मागणी स्त्रिया करताना दिसतात. या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढायलाच हवे.
साधारणपणे पाळी चालू असताना खास विश्रांतीची काही गरज नसते. बिचाऱ्या कामावर जाणाऱ्या महिला सगळी कामे निमुटपणे करत असतात; फक्त देवाचा विषय आला की मग ह्या समजुती उफाळून येतात. हे सगळे कर्मकांड करणाऱ्यांचा सोयीचे आणि कमालीचे दांभिक आहे. 



जगात आणि आश्चर्य वाटेल पण भारतातही काही चांगल्या प्रथा आहेत, ज्यात मुलींची पहिली मासिक पाळी साजरी केली जाते. 
काही देशांतील मासिक पाळी संबंधित प्रथांबाबत समजले ते खालीलप्रमाणे;

१. भारत : 
 दक्षिण भारतात ह्यासंबंधी एक चांगली परंपरा बघायला मिळते. ज्यानुसार जेव्हा मुलीला पहिली पाळी येते तेव्हा तिची पूजा केली जाते. दक्षिण भारतीय समुदायात, मुलीच्या पहिल्या काळाचे स्वागत ॠतुशूद्धी किंवा ऋतुकला संस्कार किंवा अर्ध्या-साडी सोहळ्याच्या माध्यमातून होणाऱ्या वयाच्या समारंभात केले जाते . मुलगी भेटवस्तू घेते आणि लंगा वोनी नावाचा पारंपारिक पोशाख परिधान करते जी एक स्कर्ट आणि साडी आहे, ज्याला अर्ध-साडी असेही म्हणतात.
हा सोहळा ज्या तारुण्यापूवीर् पोहोचलेल्या आणि आता परिपक्व व कुटूंब आणि समाजाप्रती त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी परिपक्व अशा मुलींच्या संक्रमणाचे चिन्ह आहे.
वरील चांगली प्रथा सोडली तर इतर अनेक ठिकाणी आपल्या भारत देशात पाळी विषयी अनेक गैरसमज व  काही अंधश्रद्धा आहेत.
1)पाळी आलेल्या बाईने वर्षभराच्या केलेल्या लोणची-चटण्या यांना यांना हात लावायचा नाही
2)पाळी चालू असताना केस धुवायचे नाहीत
3)पाळी आलेल्या बाईला कोणी शिवायचं नाही.
4)पाळी आली असता आजही जिथे पुजापाठ चालु असेल किंवा मंदिराच्या आत जाऊ दिले जात नाही.
5)जेवायला स्वयंपाक घरात वेगळे बसवले जाते किंवा त्यांना जेवायचे ताट वेगळे दिले जाते. वाळीत टाकल्या सारखेच जणु काही...  जरा जास्त अंधश्रद्धा म्हटले पाहिजे.

6)पाळीच्या रक्तात फार ताकद असते
या समजुतीमुळे अघोरी विद्या तंत्र-मंत्र  करणारे लोक त्यांना हे रक्त हवे असते आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
7)"ऋतुमती" म्हणजेच पाळी आलेली बाई, तिचा बळी दिला की मोठं घबाड सापडते.ही समजूत पुन्हा अघोरी विद्या तंत्र-मंत्र, जारण-मारण करणारे लोकांचीच आहे. काही लोक त्यांच्या भजनी लागतात आणि मग अशा निष्पाप जीवांचा बळी जातो
8)पाळीच्या रक्ताने भिजलेल्या कपड्यांना सापाने स्पर्श केला तर त्या बाईला आयुष्यभर मुलं होऊ शकत नाहीत


9)कचऱ्यात टाकलेल्या पॅड किंवा वापरलेल्या कपड्याला  सापाने स्पर्श केला तर त्या बाईला आयुष्यभर मुलं होऊ शकत नाहीत हा मोठा विनोद आहे. 
 आणखी बरेच काही.

आदिवासी क्षेत्रात प्रत्येक भागात नेपाळ प्रमाणे अंधश्रद्धा आहे. याचे उदाहरण समोर ठेऊन गडचिरोलीसारख्या आदिवासी भागांत मासिक पाळीतील या आठ दिवसांसाठी स्त्रियांकरिता विशिष्ट घर असते त्याला 'कूर्माघर' संबोधले जाते. या घरात पाळी आलेल्या स्त्रियांना ७ दिवस ठेवले जाते, ते वैयक्तिकही असते आणि सार्वजनिकही असते. कूर्माघर म्हणजे एक सहा बाय सहाची खोली असते, ज्यात जेमतेम महिला झोपू शकतील एवढी जागा असते. त्यातच त्यांनी खायचं, प्यायचं, बादलीभर पाणी साठून ठेवायचं, त्यातच आठ दिवस पाळीतील कापडही धुवायची आणि या घराचा मूळ हेतू म्हणजे या दिवसांत तिने बाहेर यायचेच नाही, तिची सावलीही पडू द्यायची नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर या काळात स्त्रियांना विश्रांतीची गरज असते म्हणून हि कल्पना योग्य जरी समजली तरी घटितांनुसार तेथील सगळी घरे हि बांबूची असतात. त्यामुळे तिथे राहणे सोयीस्कर नसते. जागा छोटी असल्यामुळे योग्य ती स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे मानसिक शारीरिक त्रास होत असतो. याचे उदाहरण म्हणजे गडचिरोलीत एका महिलेचा अधिक रक्तदाबाने झालेला मृत्यू, ते झाल्यांनतर सात दिवसांनी कळलं.
पश्चिम महाराष्ट्रात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तीन चार माणसांच्या कुटुंबात एकाच स्त्री असते, अशा भागात ती महिला स्वतःउन येऊन गर्भाशयाची पिशवी काढून टाकते. कारण पाळी आल्यामुळे स्वयंपाक कोण करणार यामुळे ते काढली जाते.बीड जिल्ह्य़ातील ऊस तोड कामगार महिला ही स्वतःहून गर्भाशयाची पिशवी काढून टाकत होत्या त्याचे ही कारण तेच आहे असे कळते. 

आसाम:
आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तिपीठ म्हणून पाहिलं जातं. हे मंदिर गुवाहाटी इथे आहे. 
कामाख्या देवीला "Menstruation Goddess" असा दर्जा दिला आहे - म्हणजे 'मासिक पाळीची देवी'. एकीकडे शक्तिपीठ म्हणून कामाख्या देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धांना वाव दिला जातो.

२. फिलिपिन्स : 
फिलिपिन्समध्ये जेव्हा कुठल्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची आई तिची पाळीची पॅण्टी स्वतः धुते आणि त्यानंतर त्या पॅण्टीला मुलीच्या चेहऱ्यावर लावल्या जाते. ह्यामागे त्यांची अशी मान्यता आहे की, ह्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर मुरूम येत नाही. तसेच मुलीला तीन पायऱ्यांवरून उडी देखील मारावी लागते. ह्याचा अर्थ असा की तिला तीन दिवसांची पाळी राहील.

३. आईसलंड :
आईसलंड येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळीवेळी रेड केक खायला मिळतो.
 हा केक लाल आणि पांढरा असतो, जो तिची आई बनवते.


४. जपान : 
जपान येथे मुलीच्या पहिल्या पाळीवेळी तिची आई ‘Sekihan’ नावाचा एक पारंपारिक पदार्थ बनवते. ह्या पदार्थात तांदूळ आणि बिन्स असतात.सेकीहान नावाची पारंपारिक डिश खाऊन साजरा करतात .डिशचा लाल रंग आनंद आणि उत्सवाचे प्रतीक आहे. 
 ह्यावेळी संपूर्ण कुटुंब ह्या पदार्थाचा आस्वाद घेतात आणि मुलीची पहिली पाळी साजरी करतात.

५. ब्राझील :
अमेझोनियन तिकुना जमातीतील (मूळ ब्राझील , कोलंबिया आणि पेरू येथे राहणारे लोक ) पहिल्या महिन्या नंतर तीन महिन्यांपासून एका वर्षात त्यांच्या कुटुंबातील खासगी खोल्यांमध्ये राहतात. या 'पेलाझोन' दरम्यान मुली आपल्या जमातीचा इतिहास शिकतात, त्यातील संगीताचा अभ्यास करतात आणि त्यांचे विश्वास इतर जमातीच्या सदस्यांकडून घेतात .
सर्व मुलींमध्ये स्त्रीत्व प्रवेश करण्याचा हा विधी आहे. हा काळ उत्सवाच्या शेवटी संपतो आणि मुलींचे परत समाजात स्वागत केले जाते. ब्राजीलमध्ये ही एक ब्रेकिंग न्यूज असते.तिकुना वंशाच्या मुली पेलाझोनला एक सकारात्मक प्रसंग मानतात जिथे ते स्वत: वर लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्यांच्या वारशाबद्दल शिकू शकतात. नातेवाईकांमध्ये ह्याची घोषणा केली जाते आणि ही बातमी साजरी केली जाते.


६. इटली :
इटली येथे पहिल्या पाळी नंतर मुलीला ‘Signorina’ (miss/young lady) असे म्हणून संबोधले जाते. येथे देखील सर्वांना ही बातमी सांगितली जाते. एवढच नाही तर लोकं मुलीचे अभिनंदन करण्यासाठी देखील येतात.

७. दक्षिण अफ्रीका :
दक्षिण आफ्रिका येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळी वेळी एक ग्रँड पार्टी दिली जाते. त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या जातात. पण पाळी दरम्यान त्यांना तीन दिवस घरातून बाहेर जाण्यास मनाई असते तसेच त्यांना पुरुष आणि लहान मुलांपासून देखील दूर राहण्यास सांगितले जाते.


८. इस्त्राइल : 
इस्त्राइल येथे मुलीला पहिल्या पाळीच्या वेळी मध खाऊ घातला जातो.
ह्यामागे अशी मान्यता आहे की ह्यामुळे तिला तिच्या पुढील मासिक पाळीत त्रास होणार नाही.


९. कॅनडा : 
कॅनडा येथे मुलींच्या पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा आहे.
 येथे पहिली पाळी आल्यावर ती मुलगी एक वर्षांपर्यंत बेरी खाऊ शकत नाही. एक वर्षानंतर तिला जेवढ्या वाटेल तेवढ्या बेरी ती खाऊ शकते.


१०. तुर्की : 
तुर्की येथे देखील पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा पाळली जाते. येथे मुलीला पहिली पाळी आल्यावर तिच्या कानशिलात लगावली जाते.



१२. नेपाळ :
नेपाळच्या खासकरून पश्चिम भागामध्ये आजही मासिक पाळीच्या चार दिवसांत स्त्रियांना घराबाहेर, गावाबाहेर एका छोटय़ा खोलीत, ज्याला ' झोपडी' म्हणतात, तिथे जाऊन राहावे लागते. काही जणींना गोठय़ात त्यांचे ‘ते चार’ दिवस काढावे लागतात, तर काही जणी त्यांच्या घराच्या खालच्या अंधाऱ्या जागेत चार दिवस राहतात, असं सांगितलं जातं.
नेपाळ मधल्या स्त्रियांना मासिक पाळीच्यावेळी अशा झोपड्यांमध्ये ठेवतात.


13)फिजी

फिजीमध्ये काही समुदाय मुलींना त्यांच्या पहिल्या कालावधीत खास चटई घालतात आणि मुलींना या मैलाचा दगड किती महत्त्व देतात याविषयी शिकवतात. त्यांच्या कालावधीच्या चौथ्या दिवशी म्हणजे 'तुनुद्र' नावाच्या प्रसंगी मुलींच्या कुटूंबाने मुलींच्या प्रवेशासाठी मेजवानी तयार केली . 



14)उत्तर अमेरीका

उत्तर अमेरिकेतील मूळ अमेरिकन आदिवासी द सनराईज सेरेमनी नावाच्या उत्सवामध्ये तारुण्यापर्यंत पोचणार्‍या मुलींना श्रद्धांजली वाहतात. या सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या विधींचा समावेश आहे जेथे जमातीतील मुली भेटवस्तू स्वीकारतात आणि देतात. मुली प्रतीकात्मक पोशाख घालतात आणि मेजवानीसह साजरे करतात .
उत्तर अमेरिकन मूळ संस्कृती ही त्यांच्या मुलांच्या जीवनात लहानपणापासून तारुण्याकडे जाण्याचा निर्णायक क्षण मानली जाते आणि त्यांचे पारंपारिक आणि समुदाय मूल्ये सांगण्यासाठी अनेक संस्कार पाळतात. 



15) यूके मधील शिक्षण विभाग  सांस्कृतिक उत्सव  नसतानाही , गरीबीच्या परिणामाचा प्रतिकार करण्यासाठी अखेरीस सर्व इंग्रजी प्राथमिक शाळांमधील पॅड्स आणि टॅम्पून सारख्या विनामूल्य सॅनिटरी उत्पादनांची ऑफर दिली ली आहे. 
16)क्रोएशियन प्रथा एक पाऊल पुढे आहे.मुलगी येथे लाल वाइनचा पेला पिऊन तिच्या पहिल्या रक्ताचा उत्सव साजरा करते. 
 ही एक प्रथा आहे ज्यात कुटुंबातील जुन्या सदस्यांद्वारे चालविली जाते.  बरं, क्रोएशियन लोकांना जीवन कसे साजरे करायचं हे माहित आहे!

काहीलोकांना या  गैरसमजुती किंवा अंधश्रद्धा आजच्या काळात मागे पडल्या आहेत असं वाटेल. हो, काहीप्रमाणात हे कमी झालंय हे सत्य आहे, पण त्याचा सगळीकडे योग्य तो प्रचार झाला नाही हे ही तितकंच सत्य आहे. 
भारतातल्या स्त्रियांच्या सुदैवाने त्यांना नेपाळसारखे गावाबाहेरच्या झोपडीत राहावं लागत नाही.
तेव्हा ,आपण थोडी विज्ञानाची कास धरु  या अंधश्रद्धांना खतपाणी न घालण्याची शपथ घेऊ.

मला असे वाटते की मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या स्त्रियांनी ह्याही विषयाला वाचा फोडावी आणि ह्या बुरसटलेल्या हीन अंधश्रध्दांना मूठमाती देण्यासाठी जनजागरण करावे.अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करण्यात आली आहे व त्यांना हे सर्व माहीत ही आहे पन काय उपयोग..
ह्या ब्लाॅग मधून कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न नसुन सत्य मांडण्याचा प्रयत्न आहे.

मासिक पाळी विषयी विज्ञान , श्रद्धा - अंधश्रद्धा या बद्दल चर्चा करण्याची खरंच गरज नाही का ?


@crazycervix 


No comments:

Post a Comment