मुळातच एड्स झालेल्या व्यक्तीकडे जेव्हा आपण पहातो तेव्हा नकळत आपल्या डोळयांवर एक नैतिकतेचा चष्मा चढत असतो. त्याचे कारणही तसेच आहे. हा आजार प्रामुख्याने लैंगिक मार्गातून पसरतो. यामुळे आपला आजार सर्वांपुढे येऊ नये असे एड्सच्या रूग्णालाही वाटत असते. समाजाचा दृष्टीकोन आणि रुग्णांची भीती यामुळे एड्स झाल्याचे निदान झाल्यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया निराशेची, भीतीची आणि रोग लपवण्याची होते. डॉ. एडॉल्फ मेयर या मानसशास्त्रज्ञांचं एक वाक्य एड्सच्या आजाराचे अगदी चोख वर्णन करते. 'मानवी साद- प्रतिसादांच्या अनंत पैलूंनीच एखाद्या आजाराला आजारपण प्राप्त होत असते.'
कोणताही संसर्गजन्य आजार विषाणूंमुळे होतो. या विषाणूंना मारून टाकणारी लस जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यन्त हताशपणे मानवजातीने या आजाराचे 'आजारपण' वाढवत ठेवायचे का? हा खरा प्रश्न आहे. याचे उत्तर नाही आहे. मगं यासाठी आपण या रोगाबद्दलची आपली जागरुकता व माहिती वाढवली पाहिजे. एचआयव्हीची लागण झाल्यावर म्हणजे आपल्या शरीरात विषाणूचा प्रवेश झाल्यावर व्यक्ती साधारणपणे पुढील अवस्थांमधून जाते.
१. अवगुंठीत काळ (विंडो पिरिअड) -
संसर्ग झाल्यापासून सरासरी ३ते १२ आठवडे या काळांत मानवी शरीरात विषाणूंचा सामना करण्यासाठी प्रतिप्रथिने (Antibodies) निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असते. म्हणून या काळात शरीरामध्ये एचआयव्ही विषाणू असूनसुद्धा प्रतिप्रथिनांद्वारे होणारी प्रचलित रक्तचाचणी (एलिसा टेस्ट) नकारात्मक होऊ शकते. हा काळ कधी कधी सहा महिन्यांपर्यंत सुद्धा असू शकतो.
२. लक्षणविरहित काळ -
या काळात एचआयव्हीबाधित व्यक्तींमध्ये काहीही लक्षणे दिसून येत नाहीत. ही अवस्था ८ ते १० वर्षापर्यंत आढळून येते. काही व्यक्तींमध्ये १२ वर्षे किंवा अधिक असू शकते, तर काहींमध्ये अत्यल्प असू शकते, या काळात रक्ताची एलिसा टेस्ट सकारात्मकच येते.
३. एचआयव्ही - एड्स -
एचआयव्हीबाधित व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती हळूहळू खूप कमी होते आणि रूग्णामध्ये पुढील लक्षणे मुख्यत्वेकरुन दिसतात.
लक्षणे -
- वजन कमी होणे- मूळ वजनात १० टक्के किंवा अधिक घट होणे.
- एक महिन्याहून अधिक काळ खोकला किंवा जुलाब होणे.
- सतत किंवा अधूनमधून येणारा ताप.
शिवाय वरचेवर न्युमोनिया, फुफ्फुसाचा क्षय, नागीण, कावीळ, अन्ननलिकेला बुरशीमुळे येणारी सूज, कातडीचे आजार, त्वचा कर्करोग असे अनेक आजार होतात. या अशा नव्या जंतुसंसर्गांनी शरीर दुबळे बनते, अनेक रोगांचे जंतू शरीरावर ताबा मिळवतात. या विशिष्ट चिन्हे व लक्षणे असलेल्या अवस्थेलाच 'एड्स' संबोधतात. ही लक्षणे आढळल्यावर योग्य उपचार न झाल्यास, या आजारांमध्ये २ वर्षांच्या आत एड्सच्या रुग्णाचा मृत्यू होतो.
उपाय -
यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे एचआयव्ही होऊ नये म्हणून काळजी घेणे. मुख्य म्हणजे या आजारावर रामबाण औषध अथवा लस उपलब्ध नाही, म्हणून प्रतिबंध हाच उत्तम मार्ग होय. हा आजार बर्याच अंशी माणसाच्या जोखीमपूण वागणूकीशी किंवा मानसिकतेशी निगडीत असल्याने तो टाळता येणे सहज शक्य आहे.
रोग टाळण्यासाठी करावयाच्या गोष्टींचे पालन -
अ) एकनिष्ठ जोडीदाराशीच लैंगिक संबंध ठेवावे. एकापेक्षा अनेक व्यक्तींशी किंवा अनोळखी व्यक्तींशी शरीरसंबंध टाळावे. संभोगाच्यावेळी निरोधचा (कंडोम) वापर करावा.
ब) अधिकृत रक्तपेढ्यांमधूनच रक्त घ्यावे. निर्जंतुक न केलेल्या सुया व सिंरींजेसचा वापर टाळावा. याबरोबरच इंजेक्शनद्वारे मादक द्रव्यांचे सेवन टाळावे.
क) एचआयव्हीबाधित मातेने गर्भधारणा किंवा गर्भपाताविषयी जबाबदार निर्णय घेण्यास योग्य सल्ला घ्यावा.
रोग परीक्षण चाचणी -
एचआयव्हीची लागण झालेली व्यक्ती बाह्यांगावरुन ओळखू येत नाही म्हणून प्रयोगशाळेत रक्तचाचणी करूनच याचे निदान करता येते। सर्वसाधारणपणे एलिसा टेस्ट व रॅपिड टेस्ट या दोन चाचण्यांनी निदान केले जाते. एचआयव्हीचा संसर्ग झालेली व्यक्ती रोजच्या आयुष्यात आवश्यक ती खबरदारी घेऊ शकते, जेणेकरुन आयुष्याचा कालावधी व दर्जा वाढवू शकेल. एकचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यावर त्या व्यक्तींस धक्का बसून राग, दु:ख, चीड, नैराश्य, भीती अशा भावना मनात येऊ शकतात. अशा वेळी त्या व्यक्तीला जवळच्या माणसाच्या आधाराची व मदतीची आवश्यकता असते. स्वत: एचआयव्हीबाधित व्यक्तीने काळजी घेताना. योग्य सकस आहार, व्यायाम, डॉक्टरांचे मार्गदर्शन, सुरक्षित लैगिक जीवन, आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. घरातल्या इतर लोकांनी आपल्या विश्वासाच्या डॉक्टरांकडून एचआयव्ही-एड्सबद्दल शास्त्रीय माहिती करुन घेतली पाहिजे व रूग्णास मानसिक आधार दिला पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरुन त्याचे आयुष्य मानसिक व शारीरिक अशा दोन्ही रीतीने सुसह्य होईल.
एचआयव्ही-एड्स पसरण्याचे टप्पे -
एखाद्या सांसर्गिक आजाराच्या साथीचा विचार करता तो कसा, किती प्रमाणात पसरतो, त्याचे टप्पे कसे असू शकतात याचा अंदाज करता येतो. एचआयव्ही-एड्सबद्दल हे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
पहिला टप्पा (अत्यंत जोखमीचे समाज घटक) -
अनेकांशी शरीरसंबंध येणारे वेश्याव्यवसायातील स्त्री-पुरूष हे अत्यंत जोखमीचे समाजघटक आहेत. त्यांच्यात या आजाराचे प्रमाण दिसणे हा या साथीच्या आजारातील पहिला टप्पा. अनेकांशी शरीरसंबंध येत असल्यामुळे आजार होण्याचा धोका जास्त असतो.
दुसरा टप्पा (वेश्यागमन करणारे) -
वेश्या-स्त्रीपुरूषांशी शरीरसंबंध ठेवणारे समाजघटक लिंग सांसर्गिक आजाराची लक्षणं घेऊन दवाखान्यात उपचारासाठी येणार्या पुरूषांच्या संख्येवरून आजार किती प्रमाणात पसरला आहे ते लक्षात येते. जर ही संख्या वाढत असेल तर साथ दुसर्या टप्प्यात आहे असे म्हणता येते.
तिसरा टप्पा (कमी जोखमीचे समाजघटक) -
सर्वसाधारणपणे वेश्यांव्यतिरिक्त इतर स्त्रियांना कमी जोखमीचे समाजघटक समजलं जातं. कारण त्यांचे शरीरसंबंध, विशेषत: विवाहित स्त्रियांचे संबंध सहसा फक्त त्यांच्या पतीशीच येतात. मात्र त्यांनाही हा आजार होणं म्हणजे साथीनं तिसरा टप्पा गाठणं आणि साथीचं सार्वत्रिकीकरण झाले. असं म्हणावं लागतं. गरोदर स्त्रियांच्या तपासणीतून आजार झाल्याचं लक्षात येतं आणि अशा स्त्रियांच प्रमाण वाढूण, ते १ टक्क्यापेक्षा जास्त असणं हे साथ पसरल्याचं निदर्शक आहे.
भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या चार राज्यांत साथीचं सार्वत्रिकीकरण झालेलं आहे. याबरोबरच मणिपूर, नागालॅंड या राज्यातूनही हीच परिस्थिती दिसते. मात्र तिथे शिरेतून मादक द्रव्य घेण्याचं प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने येथे एचआयव्ही पसरण्याचे हे प्रमुख कारण दिसून येतं. गुजरात, गोवा ही राज्यही वरील चार राज्यांच्या मार्गावर आहेत.
त्यामानाने उत्तर भारत व केरळमध्ये साथ इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही. शिवाय कमी प्रमाण असलेल्या राज्यांची वाटचाल जास्त प्रमाणाकडे असं चित्रही कमी प्रमाणात दिसतंय. अर्थात यात केव्हाही बदल होऊ शकतो. त्यामुळे समाधानी रहाण्यात अर्थ नाही. यामुळे साथीला अटकाव आणि नाश करण्यासाठी सदैव सज्जच रहावं लागेल.
आपला देश पुरूषप्रधान संस्कृतीचा असल्यामुळे स्त्रीचे सामाजिक स्थान पुरूषांपेषा कमी महत्वाचे समजले जाते, त्यातून स्त्रियांनी लैगिक विषयावर चर्चा करणे गैर समजले जाते, त्यामुळे या परिस्थितीत स्त्रीला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक या सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. पुरूष एचआयव्हीबाधित असल्यास त्याला कुटुंबाकडून मानसिक व आर्थिक आधार मिळतो, परंतु त्या तुलनेत स्त्री ला पक्षपात सहन करावा लागतो.
त्यामुळे स्त्रियांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. स्त्री व पुरूष समाजाचे सारखेच महत्त्वाचे घटक आहेत हे लहानपणापासूनच मनावर बिंबवले पाहिजे. जनजागृती केली पाहीजे. स्त्रियांनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे.
एड्सचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त -
रोचेस्टर येथील मायो क्लिनिकच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की, एचआयव्ही बाधित व्यक्तींपैकी स्त्रियांची संख्या फार वेगाने वाढतेय. स्त्रियांना भेडसावणारे एचआयव्हीचे धोके आणि गुंतागुंत पुरुषांपेक्षा वेगळी असते. जीवशास्त्रदृष्ट्याच एचआयव्ही होण्यासाठी त्या अधिक संवेदनशील असतात. विशेषत: वीर्याद्वारे येणार्या विषाणूंना योनिमार्गातील नाजुक पेशीसमूहांना गाठणे फारच सोपे असते. एचआचव्हीबाधित स्त्रियांपैकी ७५ टक्के स्त्रियांनी एचआयव्हीबाधित पुरुषाशी शरीरसंबंध केल्यामुळे हा आजार होतो. स्त्री-पुरूषांसाठी एचआयव्हीची प्राथमिक लक्षणे तीच असू शकतात, उदा. बारीक ताप, रात्री घाम येणे, वजन कमी होणे. पणे स्त्रियांना या शिवायही सातत्याने होणारे लिंग-सांसर्गिक आजार, पॉपिलोमा विषाणूमुळे येणार्या चामखिळी यामुळे सर्व्हिकल कॅन्सर तसेच ओटीपोटाचा गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. अर्थात जोडीदाराच्या एचआयव्ही स्थितीबद्दलची माहिती आणि कण्डोमचा वापर यामुळै लागण थोपता येऊ शकते. पण स्त्रियांसाठी या आजाराचे निदान लवकरात लवकर होणे आवश्यक असते. कारण त्यामुळै औषधोपचारांचा फायदा निश्चितच होऊ शकतो, शिवाय महत्वाचं म्हणजे आईकडून मुलांना होणारी लागण रोखता येते.
पुरूष, स्त्रियांप्रमाणेच समाजाचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे कुमारवयीन मुले. साधारणत: १२ ते १८ वयोगटातील मुलांचे एचआयव्ही-एड्सची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे या समाजघटकाला लैंगिक शिक्षण देणे, एचआयव्ही-एड्सची शास्त्रीय माहिती देणे खूप गरजेचे आहे. असे झाल्यास आपल्या देशाचे भावी नागरिक या प्राणघातक आजारापासून दूर राहतील. आपली येणारी पिढी दूर राहिल.
@crazycervix
No comments:
Post a Comment