कुटुंब नियोजन कसे करावे?
कुटुंब नियोजन कसे करावे?
कुटुंबनियोजनाच्या पध्दती
तात्पुरत्या पध्दती (पाळणा लांबवणे)
या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर गर्भधारणेसाठी योग्य वेळ निवडण्यासाठीही केला पाहिजे. या पध्दती दोन प्रकारच्या आहेत-नैसर्गिक आणि कृत्रिम.
नैसर्गिक पध्दती
1. शरीरसंबंध न ठेवणे (ब्रह्मचर्य)
2. शरीरसंबंधात लवकर अलग होणे.
3. स्तनपानाचे पहिले वर्ष
4. फलनाचे दिवस टाळून शरीरसंबंध सुरक्षाकाळ
1. शरीरसंबंध न ठेवणे (ब्रह्मचर्य)
ही पध्दत बरीच प्रचलित आहे. मात्र यासाठी दोघांनाही मानसिक संयम असला पाहिजे. आधुनिक काळात ही पध्दत फार प्रचलित नाही. सुलभ साधने असताना मानसिक निग्रह पाळण्याची गरज राहिलेली नाही. धार्मिक व्यवस्थेत मात्र ब्रह्मचर्य टिकूनआहे.
2.लवकर अलग होणे
स्त्रीपुरुषसंबंधात वीर्य सोडण्याच्या आधी स्त्रीपुरुषांनी अलग होणे एक चांगली पध्दत आहे. पण या पध्दतीला बराच संयम आणि समंजसपणा लागेल. लैंगिक समाधानाच्या दृष्टीने ही पध्दत थोडी कमी समाधान देणारी आहे. पुरुषाचे वीर्य निदान बाहेर सांडून तरी त्याच्या दृष्टीने क्रिया पूर्ण होते. पण स्त्रीला मात्र या पध्दतीने लैंगिक क्रिया पूर्ण होण्याचा आनंद मिळेलच असे नाही. बोटांचा वापर योनिमार्गात करून (हस्तमैथून) ही उणीव भरून काढता येते. या पध्दतीत आणखी एक अडचण अशी की प्रत्यक्ष वीर्यपतनाच्या आधी पुरुष-इंद्रियातून पाझरणारे स्राव पूर्ण निर्बीज नसतात, त्यात थोडया का होईना शुक्रपेशी असण्याची शक्यता असते. एकूण या पध्दतीत बरीच तयारी लागते आणि शंभर टक्के यशाची खात्री देता येत नाही. इतर कोणतेही साधन जवळ नसल्यास हा मार्ग उपयोगी आहे.
3.स्तनपान
स्तनपानामुळे स्त्रीबीजनिर्मिती काही महिने टळते. जोपर्यंत स्तनपान चालू आहे तोपर्यंत मेंदू-स्त्रीबीजग्रंथी यामध्ये विशिष्ट चक्र चालू असते. यामुळे स्त्रीबीजे पक्व होणे, सुटणे, आदी क्रिया थांबतात. मासिक पाळीही या काळात येत नाही. अर्थात या पध्दतीची खात्री अगदी शंभर टक्के देता येत नाही. काही स्त्रियांना या काळात गर्भ राहतो आणि ते लवकर कळतही नाही. पण बहुतेक स्त्रियांना वर्षभर तरी याचा संततिप्रतिबंधक म्हणून फायदा होतो. स्त्रीबीजनिर्मितीची प्रक्रिया आणि जननसंस्थेतल्या बदलांची माहिती स्त्रियांना असली पाहिजे. विशेषतः गर्भाशयमुखामधून पाझरणारा स्राव/चिकटा पारदर्शक, तार धरणारा झाला की स्त्रीबीज येते आहे हे कळू शकते. याची माहिती पुढे येईलच.
4.सुरक्षाकाळ पध्दती
पाळीचा पहिला दिवस धरला तर सुमारे 14व्या दिवशी स्त्रीबीज सुटते. स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या आगेमागे तीन-चार दिवस स्त्रीपुरुष संबंध टाळला तर गर्भधारणा होऊ शकत नाही. कारण गर्भधारणेचा काळ तेवढाच असतो. म्हणून पाळी संपल्यानंतरचे दहा दिवस व पुढची पाळी यायच्या आधीचे दहा दिवस गर्भधारणेचे नसतात. मधले आठ ते दहा दिवस मात्र गर्भधारणा होऊ शकते. म्हणून हे मधले दिवस कुटुंबनियोजनाच्या दृष्टीने लैंगिक संबंध टाळण्याचे आहेत. या पध्दतीस कोणतेही साधन लागत नाही. तिथी, तारीख नीट लक्षात ठेवली तर अडचण येत नाही. मात्र अंदाज चुकण्याची शक्यता नेहमीच असते. शिवाय सर्वच स्त्रियांचे मासिक चक्र नियमित नसते. ही पध्दत वापरण्यासाठी संयम लागतो.
No comments:
Post a Comment